अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – संधी संवेदनशीलता दाखवण्याची !

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संधी संवेदनशीलता दाखवण्याची !


           अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – संधी संवेदनशीलता दाखवण्याची !

          नाशिक शहरात येत्या मार्चमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे नुकतेच समजले. गेल्या काही वर्षातील संमेलने गाजली ती अध्यक्षांच्या, स्वागताध्यक्षांच्या, आयोजक संस्थेच्या आणि उद्घाटकांच्या नावामुळे. तात्कालिक सामाजिक तणावाच्या विषयामुळे. साहित्यबाह्य विषयांच्या भोवती पिंगा घालत घालत अनेक संमेलनांचे सूप वाजले. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी फार काही या संमेलनांनी दिले असे दुर्दैवाने आठवत नाही. अर्थात, रंगीबिरंगी झब्बे, चष्म्याच्या चमकणाऱ्या फ्रेम्स, डिझायनर ड्रेसेस मात्र डोळे दिपवून गेले.

असो, यावर्षीचे संमेलन मात्र अधिक चांगले करण्याची मोठी संधी सर्व साहित्यिक मंडळी आणि मराठी जगासमोर आहे. अलीकडच्या काही महिन्यात मराठी साहित्यिक अधिकच संवेदनशील झाल्याचे पाहायला आणि वाचायला मिळाले. कणव, करूणा, स्वाभिमान, आत्मभान हे केवळ शब्दसंग्रहातून माहित असलेले शब्द अनेकांच्या वक्तव्यातून आणि निवेदनातून झिरपताना दिसले. मराठी मुलखाचे भाग्य थोर म्हणून ही संवेदनशील साहित्यिकांची मांदिआळी आज आपल्या अवती भवती वावरत आहे. परकाया प्रवेशाचे वरदान लाभलेले आजचे साहित्यिक समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि वाहिन्यावर असे काही व्यक्त होताना दिसले की, डोळे भरून आले. समस्त विश्वाचे दुख: जाणणारीआणि चिंता वाहणारी ही मंडळी सामान्य माणसाचे जगणे सुखी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास देखील मिळाला.

आता होवू घातलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही या संवेदनशील साहित्यिकांच्या मनातील सामान्य माणसाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणाऱ्या प्रेमाला आणि सामाजिक स्थिती संबंधी असणाऱ्या संवेदनेला प्रकट करण्याची मोठी संधी आहे. बोलण्यासोबत कृतीतून हे सगळे व्यक्त करण्याची मोठी संधी आहे.

संवेदनशील साहित्यिकांनी अलीकडच्या काळात समाजाचे जे चित्र पोटतिडीकीने समोर मांडले आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे. त्याआधारे असे म्हणता येईल की, मागच्या वर्षापासून समस्त मराठी समाज कोरोना संसर्गाच्या विळख्यात त्रस्त जीवन जगतो आहे. अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक मुलांना शिक्षणाला सोडचिट्ठी द्यावी लागली आहे. शासनाचा महसूल घटून त्याचा मदतीवर परिणाम झाला आहे. छोटे व्यावसायिक संकटात आहे. अतिवृष्टी, अवकाळी, बोगस बियाणे, नवे कायदे आणि शेतमालाचा कमी भाव यामुळे बळीराजा अत्यंत अडचणीत सापडला आहे. लग्न थांबली आहेत, संसार उघड्यावर आले आहेत आणि सामान्य माणसाचा जगण्याचा संघर्ष टिपेला पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर, संवेदनेने ओतप्रोत साहित्यिकांना येत्या साहित्य संमेलनात आपल्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर नसल्याचे सिद्ध करण्याची खरी संधी आहे. त्यासाठी येत्या संमेलनात करता येतील अशा काही गोष्टी पुढील प्रमाणे सांगता येतील.

या संमेलनासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा करू नये, मदत मिळाली तरी नम्रपणे परत करून ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी परत करावी. त्यातून वंचित आणि अडचणीतील समाजाला आधार मिळू शकेल.

अध्यक्षासह कुणाही निमंत्रितांनी मानधन घेवू नये. प्रवास खर्च स्वत: करावा, वातानुकुलीत निवास व्यवस्था टाळावी, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण सभामंडपात आणि साधे घ्यावे. मराठी पाककलेचा सन्मान करावा. यातून आपण सामान्य माणसाचे प्रतिनिधी असल्याचे दाखवून द्यावे.

लेखक आणि कवींनी आपल्याकडील स्वत: ची शिल्लक पुस्तके सोबत घेवून यावीत आणि ती वाचनालये, शाळांना भेट म्हणून द्यावीत. किमान एका शाळेत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आपण कसे घडलो, सध्या काय वाचतो, सध्या कुठल्या विषयाचा अभ्यास करतो हे सांगून विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवावा. त्यांना अभ्यासाचे, तर्कसंगत विचाराचे महत्व पटवून द्यावे.

संमेलनात सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नावर साहित्यिकांनी व्यक्त होण्याची अपेक्षित पद्धती यासंबंधी परिसंवाद आयोजित करून व्यक्तिगत आणि तात्कालिक लाभाच्या पुढचा विचार कसा समाजाच्या हिताचा ठरतो यावर चिंतन करावे.

संमेलन काटकसरीने करून उर्वरित निधी समारोपात स्थानिक शासकीय प्रतिनिधीकडे सुपूर्द करावा. मुळात मोठा निधी संकलित करू नये आणि निधी संकलानाचा तपशील सर्वांसाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून द्यावा. अपेक्षित पारदर्शकता प्रत्यक्षात जपावी.

साहित्यिकांनी आपल्या कार्यक्रमात वेळेवर यावे, पूर्ण संमेलन काळात मांडवात हजार राहून आपण गंभीर असल्याचे आणि सर्व चर्चेसंदर्भात संवेदनशील असल्याचे दाखवून द्यावे.

संमेलनाची स्मरणिका साध्या कागदावर दुरंगी स्वरुपात छापावी. प्रकाशनासाठी मोजक्या हार्ड कॉपी काढाव्यात, वाटपासाठी केवळ सोफ्टकॉपी वापरावी. खर्चात होणारी बचत गरीब मुलांच्या घरात आयुष्य बदलून टाकणारी दोन पुस्तके पोहचवण्यात मदत करणार हे लक्षात घ्यावे.

शेतकरी आणि शेती, आरक्षण, सांस्कृतिक दहशतवाद इत्यादी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय टाळू नयेत, त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणावी. संवेदनशील विषयावर साहित्यिकांनी बोलले पाहिजे याबद्दल आग्रह धरावा. या बोलण्यात भाषा आणि अभिनिवेश यांच्या यथार्थ उपयोगाबद्दल जमल्यास काही ठरवावे.

मराठी भाषेचा, साहित्त्याचा चाहता म्हणून मी ही भूमिका मांडली. सर्वाना ती मान्य व्हावी ही मुळात अपेक्षा नाही. संमेलनासंदर्भात आगामी काळात होणाऱ्या चर्चेसाठी हे मुद्य्ये आहेत.

तथापि, मागास प्रदेशात, शहरी वसाहतीत, शासकीय निवासस्थानात, वेतन आयोगाच्या चर्चेत, निवृत्ती वेतनाच्या संरक्षणात आणि रॉयल्टीच्या कवचात राहूनही आपल्या संवेदनशिलतेने ज्यांनी अलीकडे अवघ्या मराठी विश्वाला थक्क करून टाकले आणि विविध सामाजिक विषयावर पुढाकार घेत भूमिका मांडली त्यांनी या सूचनांचा जरूर विचार करावा ही अपेक्षा आहे. त्यातून अलीकडे त्यांच्या बद्दल वाटत असलेल्या आदर भावनेला पुष्टी मिळेल आणि सामाजिक, सांस्कृतिक विषयावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आधारही.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.